Mushtaq Ali Trophy 2022 : मुंबईला मिळाला सय्यद मुश्ताक अली करंडकाचा मान
मुंबईनं हिमाचल प्रदेशचा तीन विकेट्सनी पराभव करून, ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या सय्यद मुश्ताक अली करंडकावर आपलं नाव कोरलं. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकण्याची ही कामगिरी मुंबईनं पहिल्यांदाच बजावली आहे. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी हिमाचल प्रदेशला वीस षटकांत आठ बाद १४३ धावांत रोखलं. मोहित अवस्थी आणि तनुश कोटियननं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडून त्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यानंतर यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर आणि सरफराज खानच्या फटकेबाजीनं मुंबईला तीन चेंडू आणि तीन विकेट्स राखून विजयासाठीचं लक्ष्य गाठून दिलं. यशस्वीनं २७, श्रेयसनं ३४ आणि सरफराजनं नाबाद ३६ धावांची खेळी उभारली.























