राज्यपालांच्या आश्वासनानंतर कविताला नोकरी मिळेल? राज्यपालांच्या वक्तव्यानंतर कविताची प्रतिक्रिया
2014 साला पासून प्रलंबित असतांना राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्याने हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत सध्या ONGC मध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून कार्यरत आहे मात्र तिला महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी काम करण्याची इच्छा असून त्यासाठी 2014 पासून शासनाकडे ती पाठपुरावा करते आहे. मात्र न्याय मिळत नसल्याने अखेर नोव्हेंबर महिन्यात कविताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली होती आणि हाच मुद्दा हाताशी धरत राज्यपालांनी बुधवारी नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात आयोजित आदिवासी सांस्कृतिक भवन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर निशाणा साधला, राज्य सरकार आणि क्रीड़ा मंत्री सुनिल केदार कविता सारख्या गुणी खेळाडूला नोकरी देऊ शकत नसतील तर काहीतरी गडबड आहे अस राज्यपाल म्हणाले होते. दरम्यान माझे काम कुठे अडले आहे हे मलाच समजत नसून राज्यपालांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर तरी मनासारखी नोकरी मिळेल अशी आशा कविताने व्यक्त केली आहे.