Vishal Patil To Meet Uddhav Thackeray : अपक्ष विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार
Maharashtra Sangli Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक निकालानंतर (Lok Sabha Election Result 2024) राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच निवडणूक निकालानंतर उद्या महाराष्ट्र काँग्रेसची बैठक (Maharashtra Congress Meeting) पार पडणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या बैठकीसाठी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच सांगलीचे विशाल पाटील ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहे. सांगलीच्या जागेवरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील चढाओढ ते विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवून मिळवलेला विजय, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीचा धुव्वा उडवला. लोकसभेच्या रणांगणात सर्वात जास्त चर्चा रंगलेली ती, सांगलीच्या जागेची. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत काही प्रमाणात वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, त्यातूनही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर विशाल पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच पाठींबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार आज पहाटेच विशाल पाटील मुंबईकडे निघाले आहेत. पुण्यातून विश्वजित कदमही त्यांच्यासोबत मुंबईला येणार आहेत. अजुनही विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार आहेत.