(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja Khedkar Case : मॅडमचा कारनामा; विरोधकांची टीका
Pooja Khedkar Case : मॅडमचा कारनामा; विरोधकांची टीका पूजा खेडकर या 2022 सालच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्या आहेत. त्यानी 2019 सालची परीक्षा ही सर्वसामान्य प्रवर्गातून दिली होती. त्यानंतर 2022 सालची परीक्षा ही व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोषाचे सर्टिफिकेट जमा करून अपंगांच्या प्रवर्गातून दिल्याचं समोर आलं. पूजा खेडकरांनी या परीक्षेसाठी ओबीसी सर्टिफिकेटही काढल्याचं समोर आलं आहे. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त आयएएस अधिकारी असून त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी खेडकरांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 49 लाख रुपये इतकं दाखवलं होतं. त्यामुळे पूजा खेडकरांना क्रिमी लेअरमधून सर्टिफिकेट कसं मिळालं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूजा खेडकरांनी खोट्या अपंगत्वाचा दाखला काढला आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर यूपीएससीने तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावल्यानंतरही गैरहजर राहिल्या. नंतर कुठल्यातरी खासगी रुग्णालयातून एमआरआय अहवाल सादर केला. त्यामुळे खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅट दोघांनीही विरोध केला. तरीही त्यांना नियुक्ती कशी मिळाली याचा तपास आता केंद्र सरकारची समिती करणार आहे. आईचा थयथयाट, पोलिसांवरच अरेरावी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्यानं सर्वांनाच धक्का बसला. खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्यानं त्या अडचणीत आल्या. हे प्रकरण बरंच तापल्यानं अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस पोहोचले. पण बंगल्याचं गेट उघडायला खेडकर कुटुंबीयांनी नकार दिला. एवढंच नाही तर पूजाची आई मनोरमा यांनी पोलिसांनाच दमदाटी केली आणि चित्रिकरण बंद करा असं म्हणत थयथयाट केला. वारंवार विनंती करूनही बंगल्याचं गेट उघडण्यास नकार दिल्यानंतर पुणे पोलिसांनी खेडकर यांना व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवली. या गाडीचा उपयोग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने तपास करायचा आहे असं सांगत ही गाडी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करा असं त्यात म्हटलं आहे.