Oxygen Shortage | पिंपरी-चिचंवडमधील ऑक्सिजन कधीही संपण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाची तारांबळ
काल रात्री पिंपरी चिंचवड शहर ते पुणे विभागीय आयुक्तांपर्यंत सगळेच ऑक्सिजनवर होते. कारण ही तसं गंभीर होतं. शहरातला ऑक्सिजन रात्रीत कधीही संपण्याची शक्यता होती. सुदैवाने पहाटे दोन टँकर पोलीसांच्या मदतीने पकडण्यात आले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. शहरातील 3 हजार 900 हुन अधिक रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. यासाठी शहराला रोज 50 टन साठा लागतो. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून शहराला दुजाभाव दिला जातो, त्यामुळेच अशी भयावह परिस्थिती उद्भवल्याचा आरोप भाजप आमदार महेश लांडगे यांनी केला. औषध प्रशासनाकडून प्राधान्यक्रम चुकल्याने ही परिस्थिती उद्भवली होती. शेवटी विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त आणि अन्न औषध प्रशासनाला युद्ध पातळीवर हालचाली कराव्या लागल्या. तेंव्हा कसेबसे दोन टँकर उपलब्ध झाले. सध्या शहरात 55 टन साठा उपलब्ध आहे, जो आजची रात्रीच पुरणार आहे. त्यामुळे उद्याची सोय करण्यासाठी आज पुन्हा कंबर कसावी लागणार आहे. रोज उठून ऑक्सिजनसाठी कसरत करायला लागू नये म्हणून प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी खाजगी रुग्णालयांनी केली आहे.