Eknath Shinde On Uddhav - Raj : राज-उद्धव ठाकरेंची युतीची चर्चा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On Uddhav - Raj : राज-उद्धव ठाकरेंची युतीची चर्चा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (MNS) एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच, दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींकडूनही एकत्र येण्याबाबत संकेत दिले जात आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोनही झाला असेल असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी देखील आज एका वाक्यात महत्त्वाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असं थेट वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. त्यामुळे, शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांनी पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. यासंदर्भात शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी संकेत दिल्यासंदर्भात एकनाथ शिंदेंना विचारले असता, त्यांनी हात जोडल्याचं पाहायला मिळालं.
क्रेडाईचा कार्यकारी समारंभ आणि सर्वसाधारण सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले होते. यावेळी, पुण्यातील रस्ते व स्थानिक प्रश्नांवर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी भाष्य केलं. महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका लढलो, महायुती म्हणूनच आम्ही विधानसभा जिंकलो आणि मागील अडीच वर्षांच्या कामाची पावती लोकांनी आम्हाला दिल्याचे शिंदे म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्राच्या मनात असेल तेच होईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. यासंदर्भात शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, एकनाथ शिंदेंनी हात जोडले. तसेच, आमची महायुती मजबुती लढणार, मजबुतीने जिंकणार, असे उत्तर एकनाथ शिंदेंनी दिले.
शिवसेना-मनसेच्या युतीसंदर्भात बोलताना, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसेच, आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या युतीवर दोन्ही नेते सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.





















