Nagpur Accident : नागपुरातही ड्रंक अँड ड्राईव्ह! मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवले,
नागपूर : पुण्यातील अपघात प्रकरण राज्यभर गाजत असतानाच दुसरीकडे नागपूर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ एका मद्यधुंद कारचालक तरुणाने तीन जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत पायी जाणारी महिला, पुरुष आणि तीन महिन्याचा चिमुकला जखमी झाला आहे. या बाळाची अवस्था गंभीर असल्याची माहिती आहे. कारचालक आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेले त्याचे इतर दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. त्या गाडीत दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. कारमधील एकाला जमावाने ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तर त्याचे इतर दोन सहकारी पळून गेले आहेत.
शहरातील महाल परिसरातील झेंडा चौकात ही घटना घडली. संध्याकाळी या परिसरात अतिशय दाटीवाटीची परिस्थिती असते. याचवेळी एक भरधाव कार आली आणि तिने तीन जणांना उडवलं. गाडी चालवणारे बेदकारपणे गाडी चालवत होते, त्यांनी पायी चालणाऱ्या तिघांना उडवलं.