Farm Law Repeal : असो, आता सरकारला उपरती झाली... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोदींना टोला
PM Narendra Modi Address to Nation Withdrawing Farm Laws : मी तिनही कृषी कायदे मागे घेतोय... असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तिनही कृषी कायदे मागे घेतले. गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं मोदींनी ही मोठी घोषणा केली. मोठी घोषणा करताना मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. गेल्या दीड वर्षाहून जास्त काळ कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. तब्बल 359 दिवस शेतकऱ्यांनी राजधानीच्या सीमेवर आपला लढा सुरु ठेवला. आज अखेर त्यांच्या लढ्याला यश मिळालं. केंद्र सरकारसोबत बैठकांवर बैठका झाल्या, मात्र बळीराजा काही झुकला नाही. तो आपल्या मागण्यांवर ठाम होता. दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन अनके टप्प्यांमधून गेलं.
कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो.
असो, आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. केंद्राने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.