(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane Attack On TMC officer : अनधिकृत फेरीवाल्यांना राजकीय आश्रय? पिंपळे यांच्या भावाचे गंभीर आरोप
ठाणे : ठाण्यातल्या महिला नागरिक सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेतच. मात्र आता ठाणे महानगरपालिकेच्या महिला अधिकारी देखील असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. याचे कारण म्हणजे आजच ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. तर कल्पिता पिंगळे यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे. हा भ्याड हल्ला एका अनधिकृत फेरीवाल्याने केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
ठाण्यातील कासारवडवली नाका याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलाय. ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या आज संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या फेरीवाल्यने त्यांच्या डोक्यावर चाकुने मारायचा प्रयत्न केला, त्याच वेळी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली आणि तुटून खाली पडली. हल्ला झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या माथेफिरू फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हे थरारनाट्य भर रस्त्यात काही वेळ सुरू होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने यादव याला अटक केली.
स्थानिकांच्या माहितीनुसार पालिकेची कारवाई सुरू असताना या माथेफिरू फेरीवाल्याची गाडी कारवाई करण्यास गेलेल्या पथकाने जप्त केली होती. त्याचाच राग मनात धरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.