(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Swapnil Lonkar : स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक, नवी मुंबई ते विधानभवन पायी मोर्चा
मुंबई : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. यावरुन राज्य सरकारचा निषेध करत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे आपल्या कार्यकर्त्यांसह आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन विधानभवनाच्या दिशेनं निघाले आहेत. पायी निघालेल्या या मोर्च्यामध्ये मनसेचे 150 ते 200 कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
याबाबत बोलताना गजानन काळे म्हणाले की, "स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर सरकारने केवळ एक समिती गठीत करण्याचं आश्वासन दिलं आहे. परंतु ज्या एमपीएससी मार्फत परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये सदस्यांचं पुरेसं संख्याबळ नाही. सध्या केवळ दोन सदस्य याचं काम पाहत आहेत. हे खूपच दुर्दैवी आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करत आम्ही आता विधानभवनाच्या दिशेनं निघालो आहोत. आज हजारो एमपीएससी उत्तीर्ण मुलं नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये असे अनेक जण आहेत ज्यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पास करुन मुलाखती देखील दिल्या आहेत. मात्र त्यांना अजूनही नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. सध्या सोशल मीडियावर देखील 'मी तहसीलदार,मी बेरोजगार' असे बोर्ड घेऊन असणाऱ्या तरुणांचे फोटो व्हायरल होतं आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची दखल सरकार घेणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नाही."
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं नैराश्यात गेलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने बुधवारी पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली. पुण्यात त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने एक पत्र लिहिलं होतं, ज्यात परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्यानं होत असलेल्या वेदनांना वाट मोकळी करुन दिली. इतकं टोकाचं पाऊल का टाकावं लागलं याची व्यथा मांडत स्वप्नीलने गळ्याला फास लावून घेतला. अखेरच्या काही तासांत त्याच्या मनात काय सुरु होतं याची उत्तरं त्याने पत्रातून दिली आहेत.
दरम्यान स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर त्याच्या आईचा आक्रोश पहायला मिळाला. एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, हा माझा तळतळाट आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत हरवलेल्या आणि नोकरीची वाट बघत शेवटी फास लावून घेणाऱ्या स्वप्नीलच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईचा आक्रोश काळजी पिळवटून टाकत आहे. ऐन उमेदीच्या काळात खचून गेल्यानं स्वप्निलनं टोकाचं पाऊल उचललं, पण निर्णयाने त्याच्या आईच्या काळजावर मोठा घावच घातला. मागच्या दोन वर्षांपासून स्वप्नीलच्या मनावर होत असलेल्या आघातांचे अनुभव सांगत त्या माऊलीने सरकारला जळजळीत सवाल केला आहे. ‘मला माहितीये माझं पोरंग किती झुरायचं. दोन वर्ष माझं पोरंग किती झुरलं. आई, इंटरव्ह्यू झाला नाही, असं म्हणायचं. मी पास झालो, इंटरव्ह्यू नाही झाला,’ असं म्हणत स्वप्निलच्या आईने हंबरडा फोडला.