(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Rain Update : मुंबईत पावसाळा आणि हिवाळा , पारा 9 अंशांनी घसरला ABP Majha
कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईकर पावसाबरोबरच थंडीचा अनुभवही घेतायत. त्यामुळे एकाचवेळी स्वेटर आणि छत्री वापरण्याची वेळ मुंबईकरांवर आलीय. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झालीय. त्याचवेळी एका दिवसात मुंबईत तापमानाचा पारा तब्बल ९ अंशांनी घसरलाय. मंगळवारी तापमान ३३.३ अंश सेल्सिअस होतं. ते बुधवारी २४.८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. त्यातच मुंबईत आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
मुंबईत कालपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. तसेच रात्रभरही पाऊस कोसळत होता. याशिवाय ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्येही पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्यानं आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिपच्या परिसरात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे पाऊस पडत आहे.
मुंबईतील सांताक्रुज वेधशाळेत रात्री 8:30 पर्यंत 68 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. विक्रोळी, सीएसएमटी, सायन परिसरात देखील ह्याच जवळपास पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. सध्याची रडारची स्थिती बघता हा पाऊस रात्रभर सुरु राहणार असल्याचं आयएमडीकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार रात्रभर मुंबईसह उपनगरांत पाऊस कोसळत होता. त्यामुळे डिसेंबर महिन्यातला 76 मिमी हा सर्वाधिक रेकाॅर्ड देखील तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.