Chandrakant Patil: अजितदादांनी पुण्यात भाजपची पिसे काढताच चंद्रकांतदादांचा तीळपापड; मतदान करताच दिला सूचक इशारा, म्हणाले, 'अजित पवार ज्या पद्धतीने बोलतायत ते पाहता..'
Chandrakant Patil: पालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत तत्कालिन भाजप-शिवसेना युतीच्या सरकारवर आरोप केले होते.

Chandrakant Patil on Ajit Pawar: गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवरुन टीकेचे धनी ठरलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता त्याच मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. पालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत तत्कालिन भाजप-शिवसेना युतीच्या सरकारवर आरोप केले होते. आता या आरोपांवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना सूचक इशारा दिला आहे.
चंद्रकांत पाटलांना सूचक इशारा
चंद्रकांत पाटील म्हणाले की, अजित पवार ज्या पद्धतीने भाजपवर बोलत आहेत, आरोप करत आहेत याबाबत परवा कॅबिनेट आहे. या संदर्भात देवेंद्रजी यांच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर पुढे काय करायचं ठरवू. अजित पवार आणि शरद पवारांचं काय होणार? हे दोघे एकत्र येणार का? परत आम्हाला या सगळ्यांना मांडीला मांडी लावून बसावं लागणार का? यावर सुद्धा विचार करू असे चंद्रकात पाटील म्हणाले.
प्रकल्पाची किंमत 310 कोटी रुपये दाखवण्यात आली
दरम्यान, अजित पवार म्हणाले होते की, 1999 साली काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली होती. त्या काळात पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्यासमोर आली. त्या फाईलमध्ये प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी रुपये दाखवण्यात आली होती. मात्र चौकशी केली असता, अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष किंमत फक्त 200 कोटी रुपये असल्याचे कबूल केले, असा दावा अजित पवारांनी केला.
अजित पवारांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पाच्या किंमतीत वाढ ही आधीच्या भाजप–शिवसेना युती सरकारच्या काळात करण्यात आली होती. त्या काळात सिंचन खाते भाजपकडे होते. एका अधिकाऱ्याने मला सांगितले की, पार्टी फंडासाठी 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यात अधिकाऱ्यांनी स्वतःचे 10 कोटी जोडले आणि अशा प्रकारे 200 कोटींचा प्रकल्प 310 कोटींवर नेण्यात आला, असा गंभीर आरोप अजित पवारांनी केला. अजित पवारांनी पुढे सांगितले की, या सगळ्याची फाईल आजही माझ्याकडे आहे. ती बाहेर काढली असती, तर मोठा हाहाकार उडाला असता, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, अजित पवारांच्या या आरोपांवर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. “199 साली मी अर्थमंत्री होतो. त्या काळात असा कोणताही निर्णय झाल्याचे मला आठवत नाही. शिवाय, जर इतकी गंभीर माहिती होती, तर अजित पवारांनी ती 25 वर्षे लपवून का ठेवली?” असा सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















