निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या साईटवर आज त्यांनी काय केलं हे सांगणं बंधनकारक केलं पाहिजे. अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक कार्यालयात रोज बसवले गेले पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray on Election Commission: निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात याचाही आता खुलासा झाला पाहिजे. मुंबईची महापालिका निवडणूक नऊ वर्षांनी होते, मग नऊ वर्ष जे जे निवडणूक आयुक्त असतील, त्यांचा कर्मचारी वर्ग काय करत होता? असा संताप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर मनपा निवडणुकीतही मतदारयाद्यांमधील घोळ कायम असल्याने अनेकांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आयोगाच्या कारभारावर हल्ला चढवला.
शहरातली लोकशाही जिवंत ठेवा
उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील कलानगर भागात सहकुटुंब (रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासह) मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी जिथे जिथे निवडणुका आहेत तिथल्या सर्व मतदारांना विनंती करेन की आपण आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि या देशातली राज्यातली शहरातली लोकशाही जिवंत ठेवा. सकाळपासून मला वेगवेगळ्या ठिकाणातून मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच. नाव वगळली जात आहेत, हा गोंधळ काय संपत नाही. मला कळवण्यात आलं की बोटावरची शाही पुसली जात आहे.
ते म्हणाले की, आता रोज निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या साईटवर आज त्यांनी काय केलं हे सांगणं बंधनकारक केलं पाहिजे. अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात रोज बसवले गेले पाहिजेत. जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की हे दादागिरी करणारे भाई लोक हे वर्षभर आणि निवडणुका नसतात त्यावेळेला काय करतात. हा निवडणुकीचा किंवा याद्यांचा घोळ हा ताबडतोब थांबवला गेला पाहिजे नाहीतर निवडणूक आयुक्तांवरती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
राज ठाकरे सुद्धा संतापले
दरम्यान, येन केन प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्यासाठी वाटेल ते सरकार आणि प्रशासन करत असल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे म्हणाले की, दुबार विषयामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंधच नाही. मग 10 लाख मुंबईमध्ये दुबार मतदार जाहीर केले. त्यानंतर विषय आला व्हीपॅटचा, मग म्हणाले, आम्ही व्हीपॅट वापरणार नाही. आता नवीन 'पाडू' नावाचं यंत्र मतमोजणीच्या वेळी वापरलं जाणार. म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायची नाही. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही. त्याची स्पष्टताही निवडणूक आयोगाने दिली नसल्याची ते म्हणाले. आजपर्यंत ती इंक लावली जायची, आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि त्या पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येतात की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाही जाते. आजपर्यंत शाही लावली जायची, मग आता मार्कर का? अशी विचारणा त्यांनी केली. मतदान करा, शाही पुसा, पुन्हा मतदान करा हाच विकास आहे का? असेही त्यांनी हताशपणे विचारले.
इतर महत्वाच्या बातम्या




















