(Source: ECI/ABP News/ABP Majha)
थकबाकी पगारसाठी निवासी डॉक्टर आक्रमक; 7 दिवसात थकीत रक्कम न दिल्यास सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा
मुंबई : मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सायन, नायर, केईएम आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टर थकबाकी आणि पगारवाढीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. पालिकेकडून त्यांना देण्यात येणारा 10 हजार रुपये कोविड भत्ता हीच पगारवाढ असून 11 महिन्यांची थकबाकी नामंजूर करण्यात आली आहे. याबाबत निवासी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. सात दिवसात थकबाकी न देण्याचा निर्णय मागे न घेतल्यास पालिका रुग्णालयातील तब्बल तीन हजार डॉक्टर सामूहिक रजेवर जातील असा इशारा पालिका मार्ड संघटनेने दिला आहे. डॉक्टरांच्या सेवेची दखल घेत पालिकेने प्रोत्साहन म्हणून पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसह कोविडसाठी काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना दहा हजार रुपये भत्ता लागू केला. त्याच दरम्यान मे 2020 मध्ये सरकारी निवासी डॉक्टरांचा पगार अर्थात विद्यावेतन 1 हजार रुपयांनी वाढवले तरी पालिका रुग्णालयातील 3000 डॉक्टरांना दहा हजार रुपयांची पगारवाढ मिळालेली नाही. ही थकबाकी लवकरात लवकर मिळावी अशी या डॉक्टरांची मागणी आहे. पालिकेने मात्र थकबाकी देण्यास नकार दिला आहे हीच पगारवाढ आहे. त्यामुळे थकबाकी नामंजूर करण्यात येत असल्याचे अधिकृत पत्र पालिकेच्या वतीने जारी करण्यात आले. त्यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये नाराजी आहे.