(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC Budget 2024 : सलग दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक सादर करणार
मुंबई महापालिकेचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर होणार असून, मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीपेक्षा तीन हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षीचा ५२ हजार ६१९ कोटींचा अर्थसंकल्प यंदा ५५ हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. एकीकडे मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आठ हजार कोटींनी घटल्या आहेत, तर दुसरीकडे उत्पन्नाचे नवे स्रोतही आटले आहेत. पण तरीही निवडणूक वर्ष डोळ्यांसमोर ठेऊन फुगीर अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता कमी असली तरी, जुन्या योजना आणि प्रकल्पांसाठी भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत सात मार्च २०२२ रोजी संपली होती. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून बीएमसीच्या कारभाराचा गाडा आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडून हाकला जात आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मुंबई महापालिकेची निवडणूक अजूनही झालेली नसल्यानं, यंदा सलग दुसर्या वर्षी प्रशासकच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.