Zero Hour Guest Center : विधानसभेसाठी ठाकरेंच्या 'मिशन विदर्भ'चा फटका कुणाला?
विदर्भात विधानसभेच्या बासष्ट जागा आहेत. त्यातील ३० पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात आहेत तर ३२ जागा पूर्व विदर्भात म्हणजे नागपूर विभागात आहेत. १९९० साली शिवसेना-भाजप युतीने पहिल्यांदा एकत्र विधानसभा लढवली होती. भाजप शिवसेना युती असताना भाजप विदर्भातील साधारण ५० जागा लढवत आली आहे तर शिवसेनेच्या वाट्याला १० ते १२ जागा यायच्या. आत्तापर्यंत शिवसेनेला पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात जास्त यश मिळालं आहे. अगदी २०१४ पर्यंत दोन्ही पक्षांनी वेगवेगळं लढेपर्यंत साधारण हेच चित्र होतं. गेल्या विधानसभेला म्हणजे २०१९ साली शिवसेनेनं पूर्व आणि पश्चिम विदर्भ मिळून १२ जागा लढवल्या होत्या. त्यातील फक्त चार जागा जिंकल्या होत्या.. ह्या सर्व जागा पश्चिम विदर्भातील होत्या. पूर्व विदर्भात पाटी कोरीच राहिली. पण तरीही ह्या खेपेला उद्धव ठाकरेंनी पहिले लक्ष केंद्रित केलंय ते पूर्व विदर्भावर. मित्र पक्ष काँग्रेसच्या नाना पटोलेंचा विभाग. कट्टर शत्रू देवेंद्र फडणवीसांचा विभाग. विदर्भ म्हणजे आधी काँग्रेस आणि नंतर भाजपचा गड. ज्याला विदर्भात जास्त जागा त्याचा सत्तेचा मार्ग सुकर असं लक्षात आल्यामुळेच आता उद्धव ठाकरेंनी विदर्भाकडे लक्ष केंद्रीत केलं असावं. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे हे आवाहन फक्त भाजपलाच नव्हे तर काँग्रेसला सुद्धा आहे हे विसरता कामा नये.
यात ठाकरेंना किती यश मिळतं आणि त्यांचा मविआतील मित्र पक्ष काँग्रेस आणि त्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याकडे कसं बघतात यावर २०२४ च्या विधानसभेची गणितं अवलंबून असतील.
या बातमीसोबत झीरो अवरमध्ये आता घेऊयात एक छोटा ब्रेक. ब्रेकनंतर पाहणार आहोत फेक नॅरेटिव्हमुळे महायुतीचा पराभव झाला आहे का?