Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार? फडणवीसांची घेतली भेट!
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार? फडणवीसांची घेतली भेट!
राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्यापासून उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्यातच, भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून जागावाटपामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून आलं. मात्र, अद्यापही महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम झालं नसून काँग्रेस व शिवसेना युबीटीमध्ये (Shivsena) काही जागांवरुन वाद आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील मतभेदही भर पत्रकारपरिषदेतून समोर आले होते. त्यानंतर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते व प्रभारी रमेश चेनीथला यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेऊन जागावाटपावर चर्चा केली होती. मात्र, अद्यापही शिवसेना व काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यातच, आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. मात्र, काँग्रेसने हे वृत्त फेटाळले असून ती बातमी पेरण्यात आलीय, आमच्या भांडणं लावण्याचा हा प्रयत्न असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंच्या आक्रमकतेमुळे काँग्रेसनेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे. तसेच, महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा कायम असून शिवसेना ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात येत असून 288 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याची सुत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असून दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संजय राऊत यांच्यातही दिल्लीत चर्चा झाल्याचा दावा काँग्रेसमधील काही नेत्यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंकडून कालच्या भेटीनंतरच स्वबळाची तयारी सुरू करण्यात आल्याचं दिसून आलं, असं काँग्रेसमधील सुत्रांनी म्हटलंय. मात्र, काँग्रेसने हे वृत्त फेटाळले असून या दाव्यात कुठलंही तथ्य नाही, असे स्पष्ट केलं आहे. भेटीच्या दाव्यात तथ्य नाही - विजय वडेट्टीवार दरम्यान, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. या बातमीत 1 टक्काही सत्य नाही, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात तणाव वाढविण्यासाठी भाजपकडूनच अशा बातम्या पेरण्यात आल्या आहेत. मात्र, आमचा फेव्हीकॉलचा जोड आहे, असे स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलंय. वंचितनेही केला होता भेटीचा दावा दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी दिल्लीतील 7 डी मोतीलाल मार्ग याठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते. यावेळी ते एकटेच होते, ते स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले होते. मातोश्रीवर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास बैठक झाली, असा दावा वंचित बहुजन आघाडीच्या सिद्धार्थ मोकळे यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यामुळे, काँग्रेसच्या सुत्रांकडून देण्यात येत असलेल्या माहितीवरुन पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे.