Medical Admission | वैद्यकीय शाखेत प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांची फी सरकार भरणार : अमित देशमुख
मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली असताना वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून प्रवेश प्रक्रिया सुरु करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी एबीपी माझाला दिली. महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय शाखेतील प्रवेशात आरक्षणापासून वंचित राहणार्या मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार राज्य सरकार उचलणार असंही त्यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. अशातच राज्यातील मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरक्षणापासून वंचित राहणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शाखेतील फीचा भार आता राज्य सरकार उचलणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहत वैद्यकिय प्रवेश प्रक्रिया सरु करण्यात येणार असल्याचंही अमित देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.