Solapur : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला NCP च्या कार्यक्रमात पुन्हा हरताळ; पक्षप्रवेशासाठी मोठी गर्दी
कोरोना काळात धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांत होणाऱ्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना राष्ट्रीय धोरण ठरवण्याची विनंती केली, पण दुसरीकडे सरकारमधील महत्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा नियमांना हरताळ फासल्याचं चित्रं आज सोलापुरात दिसलं.
सोलापुरात एमआयएमच्या माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या मुलासह सहा नगरसेवकांच्या नातेवाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. अनेकांच्या चेहऱ्यांवर मास्कही नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाला. जयंत पाटील यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कार्यकर्त्यांना गर्दी कमी करण्यास सांगितलं. जितकी परवानगी आहे तितकेच लोक कार्यक्रमाला हजर राहा, इतरांनी बाहेर थांबा, अशा सूचना जयंत पाटील यांनी केल्या. शहरात शनिवार, रविवारी कडक संचारबंदी असतानाही राजकीय कार्यक्रमांना गर्दी होत असल्यानं राजकीय पक्षांची बेफिकीरी समोर येत आहे.



















