Sindhutai Sapkal : सिंधुताई सपकाळ यांचं अकाली निधन चटका लवणारे : Sharad Pawar
अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात सिंधुताईंवर उपचार सुरू होते. सिंधूताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरणादायी आहे. कोवळ्या वयात त्यांचा विवाह झाला.... नवऱ्याने नाकारून घराबाहेर काढल्यानंतर गाईच्या गोठ्यात त्यांनी मुलीला जन्म दिला. दगडाने तोडलेली नाळ आणि मुलीने फोडलेला टाहो हे दोन्ही प्रसंग त्या शेवटपर्यंत विसरू शकल्या नाहीत. त्या कधी रेल्वेत राहिल्या, तर कधी तर कधी स्मशानात. पोटात भुकेचा आगडोंब घेऊन हिमतीने उभे राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भीक मागण्याची वेळ आली; परंतु यातूनच त्यांना अनाथांच्या प्रश्नांचे भेदक दर्शन झाले. अनाथांची आई होण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केलेत. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. 'अनाथांची माय' असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.