Sanjay Raut Statement Controversy : संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे घमासान, सत्ताधारी आक्रमक
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा 'चोर'मंडळ असा उल्लेख केला. राऊतांच्या याच वक्तव्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस गाजला. राऊतांविरोधात सत्ताधारी शिवसेना गट आणि भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणीही भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली. यावरुन विधीमंडळात गदारोळ झाला. यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं मत वाचून दाखवलं. तसेच, दोन दिवसांत यासंदर्भात चौकशी करुन पुढील निर्णय बुधवारी जाहीर करु असं राहुल नार्वेकर यांनी निवेदनातून सांगितलं. त्यासोबतच निर्णय वाचून दाखवताना सभागृहाचा अवमान झाल्याची टिप्पणीही राहुल नार्वेकर यांनी केली.
राहुल नार्वेकर यांनी राऊतांविरोधातील हक्कभंगाच्या प्रस्तावावर निर्णय दिल्यानंतरही सभागृहात गदारोळ सुरुच होता. सत्ताधारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यासाठी सत्ताधारी आग्रही दिसत आहेत. दुसरीकडे संजय राऊत यांनी कोल्हापुरात बोलत असताना आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून त्या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.