Sanjay Gaikwad On Rakhi Sawant : राखी सावंतला पाकिस्तानात गाडलं पाहिजे - संजय गायकवाड
Sanjay Gaikwad On Rakhi Sawant: पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानातील (India Pakistan Attack) दहशतवादी तळं उद्ध्वस्त करुन बदला घेतला. त्यानंतर पाकिस्ताननं (Pakistan) भारतावर हल्ला चढवला, भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत, हल्ला परतवून लावला. भारतानं पाकिस्तानातील नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले. अशातच बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंतनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
भारत-पाकिस्तानातील तणावाच्या काही दिवस आधीच राखी सावंत पाकिस्तानात गेली होती. त्यानंतर झालेल्या दोन्ही देशातील तणावानंतर राखीनं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावरुन राखीला चोहीकडून घेरलं. राखी सावंतवर साऱ्यांनीच निशाणा साधला. याबाबत शिवसेन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना विचारल्यानंतर त्यांनी राखी सावंतवर निशाणा साधला आहे. तसेच, तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घाला, असंही संजय गायकवाड म्हणाले आहेत.
संजय गायकवाड बोलताना म्हणाले की, "राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजेत, अशा बेताल महिला, ज्या महिलांच्या नावाला कलंक आहेत, या भारतात जन्म घेतला, याच भारतात पैसे कमावते, भारतात ऐशो-आराम करते आणि त्या देशात जाऊन त्यांचे नारे देते, तिला तिकडेच गाडलं पाहिजे, तिला आपल्या भारतात परत येऊच दिलं नाही पाहिजे."























