Shirdi : गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी घेतलं साईचं दर्शन, 5.12 कोटींची गुरुदक्षिणा
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश विश्वाला देणाऱ्या साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवात देश-विदेशातून सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डीत येत साई समाधीचे दर्शन घेतले. सुमारे 5 कोटी 12 लाख 408 रुपयांची विक्रमी गुरुदक्षिणा साईंना अर्पण केली आहे. यात 12 देशांतील 19 लाख 80 हजार 94 रुपयांच्या परकीय चलनाचाही समावेश आहे.
देश-विदेशात कोट्यवधी साईभक्त दरवर्षी शिर्डीत दर्शनासाठी येतात. ते श्रद्धेतून बाबांच्या झोळीत भरभरून दानही अर्पण करतात. याच दानातून संस्थानाने पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. साईंच्या आरोग्यसेवेचा मंत्र जोपासण्यासाठी दोन रुग्णालये उभारत गोरगरिबांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाते. साईभक्तांना शिर्डीत निवासासाठी अद्ययावत भक्त निवासेही उभारण्यात आली आहेत. आशिया खंडातील सर्वाधिक मोठे सोलार सिस्टिमवर चालणाऱ्या प्रसादालयाची निर्मिती करून दररोज 50 हजारांवर भाविकांना मोफत भोजन प्रसाद दिला जातो. सामान्य मुलांच्या शिक्षणासाठी उच्च दर्जाच्या शैक्षणिक संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे.