Jagdeep Dhankhar VIDEO : गेले जगदीप धनखड कुणीकडे? माजी उपराष्ट्रपती कुठे गायब? विरोधकांचा वार अन् सरकारचा सावध पवित्रा
Where Is Jagdeep Dhankhar : राजीनामा दिल्यापासून जगदीप धनखड नेमके कुठे आहेत असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. त्यावर मोदी सरकारने मात्र सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय.

मुंबई : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यामुळे मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना एक महत्त्वाचा मुद्दा मिळाला. उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यापासून धनखड गायब आहेत आणि त्याची चिंता इंडिया आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत. काँग्रेसचे जुने नेते आणि सपाकडून राज्यसभेत पोहोचलेल्या कपिल सिब्बल यांना 'लापता लेडीज' हा सिनेमा आठवला, तर संजय राऊतांना थेट विरोधकांना संपवणारे देशच आठवले. त्याचवेळी राजस्थानमध्ये धनखड यांचं समर्थन करणाऱ्या प्रवक्त्याला भाजपनं सहा वर्ष निलंबित केलं.
जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणावरुन उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला त्याला दोन आठवडे लोटले. पावसाळी अधिवेशन सुरु असताना जितक्या तडकाफडकी त्यांनी राजीनामा दिला त्यावरुन चर्चा सुरु झाली. त्यात पंतप्रधानांनी दुसऱ्या दिवशी केलेल्या गूढ ट्विटमुळे ऑल इज नॉट वेल अशी शंका विरोधकांनी घेतली.
जगदीप धनखड गेले कुठे?
त्या दिवसापासून म्हणजे 21 जुलैपासून जगदीप धनखड कुठे गायब आहेत असा प्रश्न आता विरोधक उपस्थित करत आहेत. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी तर लापता उपराष्ट्रपती अशी खिल्ली सुद्धा उडवली. जगदीप धनखडांची सुरक्षा आता विरोधकांनीच केली पाहिजे असं सांगत गृहमंत्री अमित शाहांनी निवेदन द्यायला हवं अशी मागणी केली.
दुसरीकडे ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा तोच मुद्दा उचलला. माजी उपराष्ट्रपती कुठे गायब आहेत, धनखडांचे काय झाले असे प्रश्न त्यांनी विचारले. राजकीय व्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे असा आरोप केला. विरोधकांना गायब करण्याची परंपरा चीन, रशियामध्ये आहे असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं.
भाजप प्रवक्ता सहा वर्षांसाठी निलंबित
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे मोदी सरकारला स्पष्टीकरण देणं अवघड बनलं. त्यातच राजस्थानमध्ये भाजपने कृष्णकुमार जानू या आपल्या प्रवक्त्याला सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकलं. सत्यपाल मलिक आणि जगदीप धनखड यांची बाजू घेणारा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
हे दोन्ही ज्येष्ठ नेते जाट होते असा उल्लेख करत, या जुन्या नेत्यांना पक्ष अशी वागणूक देऊ शकतो तर तुमच्यावर ती वेळ येणार नाही कशावरुन असा प्रश्न त्याने भाजपच्या आमदार, खासदार,नेत्यांना विचारला होता.
सरकार आणि धनखड यांच्यात मतभेद?
आपण छोटीशी, कमी पगाराची, कमी मान सन्मानाची नोकरी सोडताना सुद्धा दहादा विचार करतो. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती सारख्या अतिमहत्त्वाच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन टाकला. ही गोष्ट रागाच्या भरात, भावनेच्या भरात केलेली कृती नाही असं अनेक जण मानतात. सरकार आणि धनखड यांच्यात वाढलेली दरी हेच एक महत्त्वाचं कारण होतं असा विरोधकांचा आरोप आहे.
धनखड शांत राहणार की 'टायमिंग' साधणार
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर आहे त्यामुळे भाजप सावध पवित्र्यात आहे. अनेक दशकांच्या राजकारणाचा उबग आल्याने जगदीप धनखड यांनी काही काळ शांत राहण्याचं ठरवलं असेल. मात्र धनखड शांत राहणाऱ्यांपैकी नाहीत, कदाचित ते योग्य टायमिंगची वाट पाहात असतील. त्यांची समजूत काढण्यात मोदी-शाहांना यश आलं नाही तर मोदी सरकारच्या अडचणी वाढतील हे नक्की.























