Pune Wagholi Accident : पुण्यात अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
Pune Wagholi Accident : पुण्यात अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
पुण्यातील वाघोली केसनंद परिसरामध्ये काल (रविवारी) रात्री उशीरा बारा ते एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना वाघोलीतील केसनंद परिसरात डंपरने चिरडलं. पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मृतांमध्ये एक आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. या ठिकाणी जवळपास 40 जण होते, रात्री नेमकं काय घडलं त्याबाबत तिथे उपस्थित असलेल्या कामगारांनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.
एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले, 'आम्ही सगळे अमरावतीचे आहोत. अमरावतीवरून या ठिकाणी विविध कामांसाठी आलो होतो. मात्र काल रात्री साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली, आणि आमच्या कुटुंबातले तीन जण यात गेले. आमची हीच अपेक्षा आहेत की आता आम्हाला घरादराची व्यवस्था करावी. आमच्या गावी कोणतीही सोय नसल्यामुळे आम्हाला काम कामासाठी पुण्यात यावं लागतं मात्र, राहायची सोय नसल्यामुळे अशा पद्धतीने फुटपाथवर देखील झोपायला लागतं. अपघातात माझा पुतण्या आणि दोन लहान मुलांचे निष्पाप बळी गेलाय, असं मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.