(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Car Accident Special Report : दोघांना चिरडणाऱ्या धनाढ्य बापाच्या मुलाला काही तासात जामीन
Pune Car Accident Special Report : दोघांना चिरडणाऱ्या धनाढ्य बापाच्या मुलाला काही तासात जामीन
पुण्यात प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं २ आयटी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं... पण ज्यानं अपघात घडवला त्या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला. आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अपघातावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता की नाही हे सुद्धा अद्याप समोर आलेलं नाही. पुण्यात रात्री-अपरात्री, उशिरापर्यंत सुरु असलेले बार आणि धनाढ्य बापाच्या मुलाचा बेदरकारपणा आज दोघांच्या जिवावर बेतला.
कोट्यवधी रुपये किमतीच्या या कारनं आणि कारचालकाच्या बेदरकारपणानं दोघांचा जीव घेतला. वेदांत अग्रवाल. पुण्यातल्या ब्रह्मा कॉर्प या नामांकित बिल्डरचा मुलगा. पुण्यातल्या रस्त्यावर तो मध्यरात्री भरधाव वेगात गाडी चालवत होता. कल्याणीनगर भागात याच भरधाव गाडीनं एका दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती.. की या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा. दोघेही आयटी अभियंते.
वेदांत अग्रवालवर लावण्यात आलेली कलमं जामिनपात्र असल्यानं त्याला २४ तासांच्या आत जामिनही मिळालाय. २ जणांचा जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवालला जामीन देताना कोर्टानं काय म्हटलंय, वेदांत अग्रवालनं १५ दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करावं. मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करुन घ्यावेत. भविष्यात अपघात झाल्याचं निदर्शनास आल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी. पुणे पोलिसांनी या प्रकरणात दिरंगाई केल्याचा आरोप होतोय. वेदांत अग्रवाल हा मद्यधुंद अवस्थेत होता का हे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं नाही. त्यामुळं वेदांतला जामीन मिळण्यास मदत झाल्याचा आरोप होतोय.