(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Lockdown: पुण्यात मिनी लॉकडाऊन! उद्यापासून कडक निर्बंध, काय सुरु, काय बंद?
Pune Mini Lockdown : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद रहतील. मात्र होम डिलीव्हरी सुरू राहील. मॉल आणि थिएटर्स देखील सात दिवसांसाठी बंद राहतील. आज पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. पुढील शुक्रवारी या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल, असं विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं.
काय सुरु काय बंद?
- पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएमएलची बससेवा पुढील सात दिवसांसाठी बंद
- मात्र कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी खाजगी वाहनांचा उपयोग करु शकतील.
- दिवसा पुण्यात जमावबंदी असेल.
- लग्न समारंभ आणि अंत्यविधी सोडून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी
- मायक्रो कंटेंटमेंट झोनमधे नियमांची आणखी कडक अंमलबजावणी
- पुण्यातील वाईन शॉप संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहतील. बार, रेस्टॉरंट बंद राहणार असली तरी वाईन शॉप सुरू राहतील.
- संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार बंदी असली तरी अन्नाची होम डिलीव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
पुढील शुक्रवारी परिस्थितीचा पुन्हा आढावा
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं की, पुढील शुक्रवारी या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल. त्यांनी सांगितलं की, संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार बंदी असली तरी अन्नाची होम डिलीव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तसेच दिवसा पुण्यात जमावबंदी असेल. लग्न समारंभ आणि अंत्यविधी सोडून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असणार आहे. पुण्यातील वाईन शॉप संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहतील. बार, रेस्टॉरंट बंद राहणार असली तरी वाईन शॉप सुरू राहतील.
सौरभ राव यांनी सांगितलं की, मागील आठवड्यात पुण्यात पॉझिटीव्हीटी रेट 32 टक्के होता. गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात दररोज जवळपास आठ हजार रुग्ण आढळून आले. परिस्थिती अशीच राहिली तर येत्या आठवड्यात दररोज नऊ हजार रुग्ण आढळून येतील. काल आर्मी आणि खाजगी हॉस्पिटलच्या प्रशासनासोबत बैठक झाली आणि बेड वाढवण्याचा निर्णय झाला आहे. काही हॉस्पिटल्स 100 टक्के कोव्हिड साठी वापरण्याची वेळ येऊ शकते. पुण्यात इतर शहरांमधील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतायत. पश्चिम महाराष्ट्रील पाचही जिल्ह्यांमध्ये बेडची संख्या वाढवण्याचा निर्णय झाला आहे. त्याबद्दल त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे.
ते म्हणाले की, मायक्रो कंटेनमेंट झोनमधे नियमांची आणखी कडक अंमलबजावणी केली जाईल. काल एका दिवसात पावणे तीनशे बेड वाढवण्यात आले आहेत. आज अडीचशे बेड वाढवण्यात आलेत. येत्या काही दिवसात आणखी बेड वाढवण्यात येतील. कोरोना रुग्णांच्या बिलांची ऑडीट पुन्हा सुरू करण्यात येतंय. जेणेकरुन खाजगी हॉस्पिटल्सकडून अतिरिक्त पैसै घेतले जात नाहीत ना यावर लक्ष राहील, असं त्यांनी सांगितलं.