CMO च्या ट्वीटमध्ये धाराशिव-उस्मानाबाद उल्लेख, औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा?
मुंबई : औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद रंगलेला असताना आता उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दाही कळीचा ठरण्याची शक्यता आहे. उस्मानाबादमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवर त्याची माहिती देताना शहराचा उल्लेख 'धाराशिव-उस्मानाबाद' असा करण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादशी संदर्भात निर्णय झाला तेव्हा त्याची माहिती देताना सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख होता. तर काल उस्मानाबादबाबत निर्णय झाला त्यावेळी धाराशिव असा उल्लेख करण्यात आला. प्रसिद्धीपत्रकात उस्मानाबाद असाचा उल्लेख होता. परंतु सीएमओच्या ट्विटर हॅण्डलवर धाराशिव-उस्मानाबाद असा उल्लेख केला आणि चर्चेला सुरुवात झाली.






















