New criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP Majha
Bharatiya Nyaya Sanhita : देशात 1 जुलैपासून जुने कायदे रद्द होऊन त्यांची जागा तीन नवे कायदे घेणार आहेत. भारतीय दंड संहिता (1860) च्या बदल्यात भारतीय न्यायिक संहिता (Bharatiya Nyaya Sanhita), फौजदारी प्रक्रिया संहिता IPC (1898) च्या बदल्यात भारतीय नागरीक संरक्षण संहिता (Bharatiya Nagarik Suraksha Sanhita) आणि भारतीय पुरावा कायदा (1872) च्या बदल्यात भारतीय साक्ष अधिनियम (Bharatiya Sakshya Adhiniyam) हे कायदे लागू होतील. त्यामुळे कोर्टात सुरू असलेल्या जुन्या खटल्यांचे काय होणार असा प्रश्न विचारला जात आहे.
देशात जरी नवीन कायदे लागू होत असले तरी जुन्या खटल्यांवर मात्र त्याचा काही परिणाम होणार नाही. जुने खटले हे जुन्याच आयपीसी आणि सीआरपीसी कायद्यानुसार सुरू राहतील. मात्र 1 जुलैपासून जे काही नवीन गुन्हे वा खटले सुरू होतील त्यांना मात्र नवीन कायदा लागू होणार आहे.
वकील आणि न्यायाधीशांच्या डोक्याला ताप
वकील आणि न्यायाधीशांना आता नवीन आणि जुने अशा दोन्ही कायद्यांचे भान ठेवावे लागणार आहे. जुने गुन्हेगारी खटले जुन्या IPC अंतर्गतच चालू राहतील. तर 1 जुलै रोजी आणि त्यानंतर झालेले गुन्हे नवीन कायद्यांतर्गत आहेत. एफआयआरमध्ये कायद्याचे नाव आणि कलम बदलले जातील.