(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navratri 2021 : घटस्थापना किंवा कलश स्थापनेचं महत्त्व!, नऊ दिवस नऊ देवींचं पूजन : ABP Majha
Shardiya Navratri 2021 : घटस्थापना, नवरात्र म्हणजे आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस. या काळात भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते, घरात घट बसवला जातो. पण या घटस्थापनेचा संबंध हा थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो. घटस्थापना म्हणजे शास्त्रशुध्द बीजपरीक्षण होय.
घटस्थापनेला आपल्याकडील कृषी संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. घटस्थापना म्हणजे प्राचीन कृषी संस्कृतीतला महत्वाचा दिवस. आपल्या शेतात जी पीकं पिकवली जातात, ज्यातून आपलं पोट भरतं त्याप्रति श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते, घरी नवीन धान्य आलेलं असतं. त्यामुळे शेतकऱ्याच्या आनंदाला आणि उत्साहाला भरती आलेली असते.
घरी आलेल्या धान्याचं मग शास्त्रशुद्ध परीक्षण केलं जातं. घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते. त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं. दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं. या नऊ दिवसात आदिमाया, आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांचीही पूजा करुन एकप्रकारे त्याप्रति भक्तीभाव प्रकट केला जातो.
आज राज्यातला बळीराजा प्रलयकारी पावसामुळे मोठ्या संकटात आहे. राज्यातील कोणत्या ना कोणत्या भागात निसर्गाचा कोप होतोय, मग तो पूराच्या रुपात असो वा दुष्काळाच्या रुपात. तरीही किमान उद्याचा काळ तरी आपल्या आयुष्यात नवचैतन्य, समृद्धी आणि स्थिरता घेऊन येईल या आशेवर आजच्या घटासाठी, सृजनोत्सवासाठी शेतकऱ्याची यथाशक्ती धडपड असेलच.