Child Marriage : बालविवाहामुळे आलेल्या मातृत्वातून अल्पवयीन मुलीचा मृत्यू, नातेवाईकांवर गुन्हा दाखल
नकळत्या वयात लग्न लावून दिल्यानं आलेल्या मातृत्वातून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर इथे हा धक्कादायक प्रकार घडला असून 14 ऑक्टोबरला 15 वर्षीय मुलीची सीझेरियन पद्धतीनं प्रसूती करण्यात आली. मात्र 15 ऑक्टोबरला अल्पवयीन मातेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे पालक, मावशी-काका, पती, सासू-सासरे यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. अणदूरच्या 15 वर्षीय मुलीचा विवाह 11 जून 2020 रोजी उत्तमी कायापूर येथील 28 वर्षीय तरुणाशी झाला. त्यानंतर वर्षभरात ती मुलगी गरोदर राहिली. अल्पवयीन वयात लग्न लावून दिल्याप्रकरणी आणि सोळाव्या वर्षी मातृत्व येऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलीच्या पालकांसह 6 जणांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.























