Corona Vaccine : मेंढपाळांचं लसीकरण कधी? भटकंती करुन गावाकडे परतणाऱ्या मेंढपाळांना कोरोना लसीची चिंता : Special Report
स्वतःचे आणि आपल्या मेंढरांचे पोट भरण्यासाठी आठ महिने भटकंती करणारा मेंढपाळ समाज आता पावसाची चाहूल लागताच गावाकडे परतू लागला असून आता त्याला कोरोना लसीची चिंता भेडसावू लागली आहे . राज्यातील भटकंती करणाऱ्या समाजापैकी सर्वात मोठा समाज म्हणून मेंढपाळांना ओळखले जाते . पाठीवर बिऱ्हाड अशी ओळख असलेला हा समाज ऑकटोबर मध्ये जगण्यासाठी आपल्या मेंढ्याच्या खांडवासहित बाहेर पडतो आणि चाऱ्याच्या शोधात सुरु होते शेकडो मैलांची पायी भटकंती .. दऱ्या खोऱ्यात आणि जंगलात मेंढ्यांच्या पोटासाठी हा समाज आठ महिने भटकत असतो . घरात अठराविश्व दारिद्र्य , कोणाला लहानसा जमिनीचा तुकडा असतो तर अनेक मेंढपाळ हे भूमिहीन आहेत . कायम दुष्काळी पट्ट्यात असलेल्या जमिनीत कुसळेही उगवत नसल्याने मेंढ्यांचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी पिढ्यानपिढ्या भटकंती नशिबी असते .























