Majha Vitthal Majhi Wari : इंदापूरमध्ये पार पडलं तुकोबांच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं रिंगण
रामकृष्णहरी माउली म्या सिद्धेश ताकवले माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या समद्यांचं स्वागत..
पांडुरंगा भेटायची आस,
आतुरले नयन,विठ्ठल वाणी विठ्ठल,
ज्ञानोबा-तुकाराम ज्ञानोबा-तुकाराम
असा जयघोष करीत असंख्य वारकरी वारीची वाट चालत्याती. आज संत तुकाराममहाराजांची पालखी निमगाव केतकी मधला मुक्काम आटोपून इंदापूर शहरात दाखल झाली बगा. जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज गोल रिंगण इंदापूरमदी पार पडलंया... इंदापूरच्या रयत शिक्षण संस्थेच्या कदम विद्यालयाच्या प्रांगणावर ह्यो रिंगन सोहळा पार पडलाया. याचि देही याची डोळा असा देखावा ह्यो रिंगन सोहळा. जशी का रिंगनाला सुरुवात झाली तसा ग्यानबा तुकोबांच्या गजरात समदा आसमंत दुमदुमुन गेला बगा. या सोहळ्यात मानाचा अश्व जसा का धावला तसा समद्यांनी ग्यानबा तुकोबांचा येकच जयघोष केला बगा. मंग या रिंगनामदी डोइवर तुळशी वृंदावन घेतलेल्या माउल्या जशा का सहभागी झाल्या तसा या उत्साहाला आनखीनच हुरुप आलं बगा. आहाहा माउली आवं काय त्ये दृश्य डोळ्यांचं पारन फेडनारं हाय का न्हाई.... ह्यो रिंगन सोहळा अनुभवन्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी मंडळी येत्याती. खांद्याव भगव्या पताका आनी इठुनामाचा जयघोष समद्या आसमंतात घुमत व्हता वो.. टाळ चिपळ्यांच्या संग ग्यानबा तुकारामाचा गजर अखंड सुरु व्हता.. मंग आपल्या पोलिसबांधवांनी बी या रिंगनाला फेरी मारली... यानंतर विनेकरी बी या रिंगनात धावली बगा.