Maharashtra Dam Water : राज्यातील धरणांत 36 टक्के पाणीसाठा शिल्लक
महाराष्ट्रात सध्या वैशाख वणवा भडकलाय... त्यामुळे, जिथं तिथं उन्हामुळे अंगाची काहिली होतेय. आणि पाऊस सुरू व्हायला अजून अवकाश आहे. त्यातच, महाराष्ट्रातील धरणांमध्ये फक्त ३६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. महत्त्वाचं म्हणजे, पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ २८.८३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात या भागातील शेतीसह उद्योग-व्यवसायांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये..राज्यातल्या एकूण ३००३ धरणांमध्ये मिळून ७८९ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तर गेल्यावर्षी याच तारखेला हा महाराष्ट्रातील पाणीसाठा ३७.३९ टक्के इतका होता. राज्यात सर्वाधिक पाणीसाठा यंदा अमरावती विभागात असल्याचे दिसून येतंय. दरम्यान, ही सगळी परिस्थिती पाहता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर आणि शासन-प्रशासन पातळीवर पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झालीय. नाहीतर डोक्यावर तापलेलं उन, तापमानाने फणफणलेला भवताल आणि घशाला कोरड अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताय.