Maharashtra vs Gujrat : महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधला सीमावाद पुन्हा पेटला
महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधला सीमावाद सातत्यानं उफाळून येत आहे. गुजरात राज्यातील उंबरगावमधल्या सोलसुंबा ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायतीत जवळपास दीड किलोमीटर अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. याच मुद्द्यावर डहाणू विधानसभेचे माकपाचे आमदार विनोद निकोले यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. त्यामुळं पुन्हा एकदा दोन्ही राज्याची यंत्रणा कामाला लागली आहे. २०१७ सालापासून गुजरातमधील सोलसुंबा ग्रामपंचायतीकडून वारंवार महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत अतिक्रमण सुरू आहे. पत्रव्यवहार करूनही दोन्ही राज्यांमधील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्ट्रीट लाईट बसवण्याची परवानगी गुजरातमधील सोलसुंबा ग्रामपंचायतीनं मागितली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या हद्दीत जवळपास दीड किलोमीटरपर्यंत ही स्ट्रीट लाईट बसवण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील 204 सर्व्हे नंबरवर गुजरातकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप वेवजीमधल्या ग्रामस्थांकडून करण्यात आलाय.