(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Monsoon : ऐन थंडीत पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भाला अवकाळी पावसानं झोडपलं ABP Majha
हिवाळा सुरु झाला तरी म्हणावी अशी थंडी आता जाणवत नाहीए. तापमानाचा पाराही चढताच आहे. त्यात मागील २ दिवसांपासून पावसाच्या इशाऱ्यामुळे राज्यात काहीशी उकाड्याचीच स्थिती आहे. अशातच काल पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगलीत, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर विदर्भातील चंद्रपुरात पावसाच्या सरी बरसल्या. साताऱा शहरासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात मुसळधार बॅटिंग केली. त्यामुळे साताऱ्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांना नुकसानाची भीती आहे. तिकडे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, दापोली, गुहागरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काही काळ का होईना हवेत गारवा पाहायला मिळाला. सिंधुदुर्गात अवकाळीच्या हजेरीमुळे झाडं, विजेचे खांब रस्त्यावर पडले तर काही घरांची कौल उडून गेल्यानं संसार उघड्यावर आले. चंद्रपूरच्या सावली-ब्रह्मपुरी-गोंडपिपरी या तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झालंय. पावसाचं पाणी शेतात शिरलंय. ऐन काढणीला आलेल्या धान पिकाचं यामुळे मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शासनानं तातडीनं नुकसानभरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.