Maharashtra School : गळणाऱ्या शाळा, सडलेली व्यवस्था; बीड, यवतमाळ धाराशीवमधील शाळंची दुरावस्था
राज्यभरात जिल्हा परिषद शाळांची कमालीची दूरवस्था झालीय. नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालंय. मुलांमध्ये नव्या वर्षाच्या अभ्यासाचा उत्साह आहे. मात्र शाळांमध्ये खरंच शिक्षणाला पोषक वातावरण आहे का असा सवाल उपस्थित झालाय. जिथे शिक्षण घ्यायचं तिथेच गळकी छपरं, धोकादायक इमारतीत विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत असतील तर ज्ञानगंगा पोहोचणार कशी असा सवाल उपस्थित झालाय. याला वाचा फोडण्यासाठी एबीपी माझाने विशेष मोहिम हाती घेतलीय. आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, राज्यातल्या धोकादायक शाळांची स्थिती... ही स्थिती राज्य सरकारने पाहावी आणि तातडीने शाळांची दुरूस्ती हाती घ्यावी असं आवाहन एबीपी माझा करत आहे.
बीड जिल्ह्यात बहुतांश भागात शाळांची दुरवस्था झालीय. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरून धडे घेत आहेत. बीड जिल्ह्यात 11 तालुक्यातील 349 शाळांच्या 592 वर्ग खोल्या धोकादायक असून याच धोकादायक वर्गात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही ठिकाणी तर चक्क झाडाखाली शाळा भरवण्याची वेळ आलीय. वर्ग दुरूस्तीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं. मात्र शैक्षणिक वर्ष सुरू झालं तरी परिस्थिती जैसे थेच आहे. मात्र शिक्षण अधिकारी सरकारी उत्तरं देताना दिसतायत.
यवतमाळच्या बोरगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 5 वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. पण शाळेत वर्ग आहेत केवळ दोन... या दोन खोल्यातूनच वर्ग आणि कार्यालयही चालतं. एकीकडे सरकार शिक्षणावर लाखोंच्या खर्चाचे दावे करतं. तरी तीन वर्षांपासून मोडकळीस आलेल्या वर्गांची डागडुजीही होत नाहीये. बोरगाव शाळेमध्ये तीन वर्षांपूर्वी एका खोलीच्या स्लॅब चा काही भाग कोसळला. या तीन विद्यार्थी जखमी सुद्धा झाले होते. शाळा पुन्हा बांधून देण्याचा प्रस्ताव धूळखात आहे.






















