(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Monsoon : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 25 ऑगस्ट 2024 : ABP Majha
Maharashtra Monsoon : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 25 ऑगस्ट 2024 : ABP Majha
राज्यातील बहुतांश ठिकाणी आता पावसाचा जोर वाढला असून नदी नाले ओढे तुडुंब भरले असून गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसानं धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. एकीकडे पुणे, नाशिकमध्ये नद्यांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अनेक धरणांमधून विसर्ग होत आहे. दरम्यान मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे परभणीतील निम्न दुधना धरणात 5.15 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील येलदरी धरणात दोन टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे.
परभणी जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दांडी मारली खरी पण मागच्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाच्या हजेरीमुळे जिल्ह्यातील एकूण चित्रच बदललं आहे. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने परभणीतील पूर्णा, गोदावरी, दुधना नद्या खळलल्याच चित्र आहे.
निम्न दुधनासह येलदरीतही पाणीसाठा वाढला
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार परभणीतील सर्वाधिक क्षमतेच्या निम्न दुधना धरणात आज 20.15% पाणीसाठा झालाय. मागील वर्षाच्या तुलनेत साधारणतः सहा टक्क्यांची तूट या धरणात दिसून येत आहे. मागच्या वर्षी निम्न दुधना धरण 26.92 टक्क्यांनी भरलं होतं. यंदा अवघ्या दोन दिवसांच्या पावसावर थेट सव्वा पाच टक्क्यांनी धरणसाठ्यात वाढ झाली आहे. निम्न दुधना सह हिंगोली जिल्ह्यात असणारे येलदरी धरणावर परभणी जिल्ह्याची तहान भागते.
मागील दोन दिवसात झालेल्या दमदार पावसाच्या हजेरीनंतर हिंगोलीतील येलदरी धरणातील पाणीसाठा दोन टक्क्यांनी वाढला आहे. येलदरी धरणात मागील वर्षी 59.92% पाणी होतं. आज या धरणात 38.50% उपयुक्त जलसाठा आहे.
परभणी जिल्ह्याला मोठा दिलासा
मागील दोन दिवसात झालेल्या पावसाने या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याने परभणी जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालाय. काही भागात पिकांमध्ये पाणी साठल्याने कापूस आणि सोयाबीन मध्ये नुकसानाची शक्यता आहे. शहरातील नदी नाले ओढे प्रवाहित झाले आहेत. यंदा खरीप पेरण्यांनंतर शेतकऱ्यांना पिकांना पाणी मिळतंय की नाही याची धाकधूक होती. मात्र, आता दोन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळालाय.
मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने दिलेले अंदाजानुसार मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस राहणार आहे. परभणीत पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.