(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra : महाराष्ट्रात 736 दिवसांनंतर कोरोना निर्बंध हटवले, राजेश टोपेंची घोषणा
Maharashtra to lift all Covid-19 restrictions : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्येमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये तर एकही कोरोना रुग्ण आढळत नाही. त्यातच सक्रीय रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एक एप्रिलपासून आता राज्यात कोरोनाचे निर्बंध नसतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा आणि मिरवणुका काढण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.