Latur | आली लहर केला कहर... गावाकडे जाण्यासाठी गाडी नसल्याने तरुणांनी एसटी बस पळवली!
लातूर : रात्री उशिरा गावाकडे जायला एसटी नाही म्हणून बस स्थानकातून एसटीच पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातील ही घटना आहे. दारुच्या नशेत तरुणांनी हे कृत्य केल्याचं समजतं.
रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्याने दारुच्या नशेत शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेली. एसटी पळवताना लाईटच्या दोन खांबांना देखील जोरात धडक बसल्याने विजेच्या तारा तुटून खाली पडल्या, शिवाय विजेचा खांब देखील कोसळला आहे.
बस स्थानकात झोपलेल्या चालक आणि वाहकाला पहाटेच्या सुमारास एसटी जागेवर नसल्याचं समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार औराद पोलिसांनी एसटीचा शोध घेतल्यानंतर शेळगी गावात एसटी सापडली.
या घटनेत एसटीचं 25 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. मात्र एसटी खात्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात नसल्याने गुन्हाच नोंदवलेला नाही. एसटी खात्याचा गलथानपणा या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. परंतु एसटी नेमकी कोणी पळवून नेली? एसटी पळवणाऱ्यांना पोलीस प्रशासन आणि एसटी खातं पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतंय का असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
दरम्यान संबंधित एसटी बस स्थानक छोटं असल्याने तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. परिणामी एसटी पळवून नेणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यास काहीशी अडचण येऊ शकते.
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)