Sangli Rain : कृष्णा नदीची पाणीपातळी 25 फुटांवर, सांगली-कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सांगलीच्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी आठ ते दुपारी 4 वाजेपर्यंत आठ तासात 75 मिलिमीटर पाऊस येथे बरसला. तर गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालीय. परिणामी आज दुपारी धरणाचे दोन दरवाजे उघडून 4 हजार 883 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वीज निर्मिती केंद्रातून 1125 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरण व वीजनिर्मिती असा दोन्ही मिळून सहा हजार आठ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. मुसळधार पाऊस तसेच धरणातील मुख्य दरवाजातून तसेच वीज निर्मिती केंद्रातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात तसेच चांदोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग कोणत्याही क्षणी आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन हे धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.