Jalgaon : संत मुक्ताईची पालखी आज पंढरपूरकडे रवाना होणार, शंभर वारकऱ्यांसह बसमधून पालखी निघणार
पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेकडो दिंद्या आणि पालख्या दर्शनासाठी जात असतात. यांमधे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. राज्यभरातून निघणाऱ्या पालख्यांमधे संत मुक्ताईची पालखी ही पहिल्यांदा पंढरपूरकडे प्रस्थान करीत असते. आज आषाढी पंचमी निमित्ताने ही पालखी प्रस्थान करीत आहे, मात्र कोरोणच्या पार्श्वभूमीवर पाई वारी काढण्यासाठी अनेक निर्बंध शासनाच्या वतीने लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे आज ही वारी प्रातिनिधिक स्वरूपात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील समाधी स्थळापासून मुक्ताईनगर शहरातील नवीन मुक्ताईनगर मंदिरापर्यंत पाई काढण्यात येणार आहे. त्या ठिकाणी काही दिवस विधिवत पूजन करून नंतर शासन आदेशानुसार बसच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना होणार आहे. बसने वारीसाठी परवानगी देण्यात आलेली असली, तरी पाई वारीला शासनाने परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी वारकरी कडून केली जात आहे. तीनशे बारा वर्षांची अखंड वारीची परंपरा आजपर्यंत कायम राहिली असून हजारो वारकरी आणि शेकडो दिंड्या या वारीमध्ये मोठ्या उत्साहाने आणि भक्ती भावाने सहभागी होत असतात. यंदा मात्र कोरोणाचा सावट असल्याने अतिशय मर्यादित स्वरूपात हा उत्सव साजरा केला जात आहे.