Sangali Chor Ganpati : सांगलीतील चोर गणपतीची प्राणप्रतिष्ठापना, 150 वर्षांची परंपरा
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या चोर गणपतीची पहाटे प्रतिष्ठापना करण्यात आली. हा गणपती चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून ओळखला जातो. गणेशोत्सवानिमित्त गणपती मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सांगलीच्या या Chor Ganpati ला दीडशे वर्षांची परंपरा आहे. पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी होते. या परंपरेनुसार, साडे तीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. दोन वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी त्याच दोन मूर्तींची स्थापना केली जाते. गणपती मंदिरातील गणरायाच्या मुख्य मूर्तीला डाव्या आणि उजव्या बाजूला या दोन्ही मूर्ती बसविण्यात येतात. उत्सवानंतर या मूर्ती सुरक्षित स्थळी ठेवण्यात येतात. ही प्रतिष्ठापना सांगलीतील गणेशोत्सवाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.























