Kalyan : अन्न आणि औषध प्रशासनाच्या नव्या पत्रकामुळे वाद, बंद पुकारण्याचा औषध विक्रेत्यांचा इशारा
अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील औषध विक्रेत्यांसाठी एक पत्रक काढले आहे.यात छोट्या मोठया चुका केल्यास औषध विक्रेत्याचे 15 दिवसांचे निलंबन अथवा मेडिकल बंद करण्यासंबंधी परिपत्रक काढले आहे.या परिपत्रकामुळे मात्र औषध विक्रेत्यांमध्ये संताप पसरला आहे. दरम्यान हे परिपत्रक अन्न आणि औषध प्रशासनाने त्वरित मागे घ्यावे अशी मागणी केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पत्राद्वारे केली आहे.हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न आणि औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांना पाठवण्यात आले आहे.औषध वितरण क्षेत्रात मोठ्या कार्पोरेट कंपन्यांना स्थिरावण्याची संधी मिळावी या साठी हे सगळं सुरू असल्याचा आरोप करून हे पत्रक मागे घेतले नाही,तर मात्र राज्यातील 70 हजार औषध विक्रेते आंदोलन करतील,गरज पडल्यास बंद देखील पुकारतील असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.