Maratha reservation | मराठा आरक्षणावरुन फडणवीस, महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप
मराठा समाजाला दिलेले आरक्षण जर टिकले असते तर त्याचे सर्व श्रेय भाजपला मिळाले असते. म्हणून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणचा मुडदा पाडल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विषयाची संवेदनशीलता पाहता आतापर्यंत मी राजकीय न बोलण्याचे ठरविले होते. मात्र, अशोक चव्हाण, नवाब मलिक हे ज्या पद्धतीने खोटे आणि राजकीय आरोप करत आहेत, त्यानंतर मी स्पष्ट बोलतोय. आम्ही केलेला कायदा या सरकारला टिकवता आला नाही, कारण तो टिकला असता तर त्याचे श्रेय भाजपला मिळाले असते, म्हणून या सरकारने जाणीवपूर्वक या आरक्षणाचा मुडदा पडला असे फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर महविकास आघाडी सरकारच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर अनेक आरोप केले होते. त्या आरोपांना प्रतिउउतर देत फडणवीस यांनी अशोक चव्हाण आणि नवाब मालिकांनी लावलेल्या आरोपांना थेट उत्तर दिले. न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत होत्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या असा थेट आरोपही फडणवीस यांनी केला आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका भाजपच्या लोकांनी केल्या होत्या असा आरोप नवाब मलिक यांनी केल्यानंतर फडणवीसांनी हा प्रतिआरोप केला आहे.