गणेशोत्सव काळात पुन्हा कडक निर्बंध? पुढील 2 दिवसात CM Uddhav Thackeray नवी नियमावली जाहीर करणार
Chief Minister Uddhav Thackeray's appeal : "कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या.", असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
"राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपलं आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू"
...तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री पुढे म्हणतात की, "हे उघडा, ते उघडा' या मागण्या ठिक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकानं नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणानं वागून लोकांच्या जिवाचं रक्षण करायला हवं. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असतील तर, शासनानं वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचं पालन होईल हे काटेकोरपणे पाहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल."
"महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. नव्हे नव्हे, कोरोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केलीय. अमेरिकेत तिसऱ्या लाटेनं जीवन अत्यावस्त केलं. चीनही विळख्यात सापडलाय. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज 30 हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे आणि तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर महाराष्ट्राला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. सरकार सुविधा निर्माण करील, पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करा." असेही मुख्यमंत्री आवाहनात म्हणतात.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनाबाबत आज वर्षा येथे बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन असीम गुप्ता हे या बैठकीला उपस्थित होते.