(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fish Rate : श्रावण सुरु व्हायच्या आत मासे महागले, सुरमई 1000 रुपये तर पॉपलेट 1300 रुपये किलोवर
श्रावण सुरु होण्याआधी सुरमई तब्बल 1 हजार रुपये तर पापलेट 1 हजार 300 रुपये किलो, त्यामुळे अस्सल खवय्यांची चांगलीच गोची.
एक आठवड्याने श्रावण सुरू होतोय. त्यामुळे आठवडाभर ताटात मासे, चिकन आणि मटण दिसेल. पण मासेमारी बंद असल्याने आणि बाजारात मालच कमी येत असल्याने मासेही प्रचंड महागलेत. एकीकडे भाज्या, कडधान्ये कडाडलीत तर दुसरीकडे मांसाहारही महागल्याचे चित्र आहे.
सध्या गुजरात, हावडा बंदर, पोरबंदर येथून मासे मुंबईसह महाराष्ट्राच्या बाजारात येत आहेत. मोठय़ा प्रमाणावर माल हा फ्रोझनचा आहे. त्यामुळे मासे महाग असल्याचे ठाण्यातील अरुण फीश सप्लायरचे मालक आणि मासेविव्रेते अरुण साजेकर यांनी सांगितले. मोठय़ा प्रमाणावर माल रस्तेमार्गेही येतो. मात्र रस्त्यांची चाळण झाल्यामुळे माल उशिरा बाजारात येतो. तसेच मोठय़ा प्रमाणावर माल खराबही होतो. रस्त्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे मासेच नाही तर भाज्या बाजारात वेळेत पोहोचत नाहीत आणि त्याचा फटका व्यापारी, किरकोळ विव्रेत्यांना बसत असल्याचे चित्र आहे.