Ahmednagar name Change : नगरचं नाव अहिल्यानगर करण्याला केंद्र सरकारची मंजूरी
Ahmednagar name Change : नगरचं नाव अहिल्यानगर करण्याला केंद्र सरकारची मंजूरी
विधानसभेची (Vidhan Sabha Election) आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. त्यामुळे महायुती सरकारने त्यापूर्वी जणू निर्णयांचा धडाका सुरू केल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.10) राज्याची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात ही दुसऱ्यांदा घेतलेली राज्य मंत्रिमंडाळाची (Cabinet Meeting) बैठक आहे. या बैठकीत 33 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान विधानसभेपूर्वी केंद्रानं देखील आणखी एक मोठा निर्णय घेत राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' असे नामांतर करण्याची मागणीला मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत असल्याचे चित्र आहे. तर प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाच्या दंडाची तरतूदही आज राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. नामांतरास पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' असे करण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून होत होती. यादरम्यान राज्य सरकारने या मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर अखेर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. अहिल्यानगर नावाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी असल्यामुळे अहिल्यानगर होणार का नाही? याबाबत संभ्रम अवस्था असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत औरंगाबाद हायकोर्टामध्ये अहमदनगरचे नाव बदलू नये, म्हणून याचिका दाखल केली होती. मात्र आता केंद्र सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यास मंजुरी दिल्याने ही चर्चा थांबणार आहे. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत या निर्णयाचे स्वागत करत केंद्र सरकारच्या आभार मानले आहेत.