(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Pawar Detained : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार पोलिसांच्या ताब्यात, शिवसैनिकांचीही धरपकड
Maharashtra Politics Shivsena : शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांना पोलिसांनी (Kolhapur) ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी काही शिवसैनिकांचीही धरपकड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या वेळी निदर्शने करणार असल्याची घोषणा कोल्हापूर शिवसेनेने केली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून संजय पवार यांना ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शिवसेनेने निदर्शने करणार असल्याची घोषणा केली होती. बंडखोर आमदार आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात येणार होती. ही निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार होती. मात्र, त्यापूर्वीच शिवसैनिकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे एक पथक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या निवासस्थानी धडकले. आम्ही लोकशाही मार्गाने निदर्शने करणार होतो. लोकशाहीमध्ये आम्हाला तेवढा अधिकार नाही का, असा प्रश्न पवार यांनी केला. आम्ही शांततेच्या मार्गाने निदर्शने करणार होतो. मात्र, ही कारवाई कोणाला खूष करण्यासाठी सुरू आहे, असा सवाल पवार यांनी पोलिसांनी केला. यावेळी संजय पवार यांनी संजय राठोड यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. संजय राठोड यांच्याविरोधात आरोप करणारे आज गप्प का आहेत, असा सवाल पवार यांनी केला. किरीट सोमय्या, चित्रा वाघ हे संजय राठोड यांच्याविरोधात होते. आता मंत्रिमंडळात राठोड यांचा समावेश झाल्यानंतर मूग गिळून का गप्प आहेत, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.