Jalgaon : चार अल्पवयीन मुलांच्या हत्येने जळगाव हादरलं, खासदार रक्षा खडसे म्हणतात, कडक कारवाई व्हावी
जळगाव : चार अल्पवयीन बालकांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात घडली आहे. बोरखेडा शेत शिवारात भिलाला नावाचं सालं दारी करणार कुटुंब राहतं. दोन मुलं आणि दोन मुली असलेली चार भावंड घरी ठेऊन भिलाला दाम्पत्य गावाला गेले असता, रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने या चारही जणांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केली. या हत्येमागील कारणाचा आणि आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.
ही घटना काल (15 ऑक्टोबर) मध्यरात्री घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. मृत मुलं ही 8 ते 13 वर्षे वयोगटातील ही मुलं आहेत. या कुटुंबाचं शेतातच वास्तव्य होतं.
बोरगाव शिवारात शेख मुश्ताक यांचे शेत आहे. मयताब भिलाला अनेक वर्षांपासून शेख यांच्या शेतात पत्नी, दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी भिलाला 15 ऑक्टोबर रोजी पत्नी आणि एका मुलासह मध्य प्रदेशात गेले होते. तर दोन मुलं आणि दोन मुली हे चौघेत घरी होते. आज (16 ऑक्टोबर) सकाळी शेख मुश्ताक शेतात आल्यावर त्यांना घर बंद दिसलं. त्यामुळे त्यांनी आवाज देत डोकावून पाहिलं असता, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घरात भिलाला यांची चारही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. यानंतर शेख यांनी तातडीने रावेर पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेच्या तपासासाठी पोलिसांची विविध पथकं तैनात करण्यात आली आहे. तसंच श्वान पथकाही मदत घेतली जात आहे. याशिवाय गावकऱ्यांची चौकशी केली जात असून या कुटुंबाचं इतर कोणाशी वैर होतं का? याची माहितीही पोलीस घेत आहेत. दरम्यान आरोपी लवकरच पकडला जाईल, असा दावा पोलीस करत आहेत.
दरम्यान जळगावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला या घटनेने हादरवलं आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या घटनेचा छडा लावून आरोपींना जेरबंद करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल का याची तपासणी करु : गुलाबराव पाटील, पालकमंत्री
ही घटना अतिशय घृणास्पद असून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवता येते का याचीही तपासणी केली जाईल. तसंच उज्ज्वल निकम हे त्याच जिल्ह्यातील असल्याने त्यांच्याकडे यासंदर्भात काही मदत घेतली जाईल का याचा सरकार विचार करेल, अशी माहिती जळगावचे गुलाबराव पाटील यांनी दिली. तसंच पोलीस अधीक्षक आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे. मी आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी तिथे जाऊन भेट देणार आहे. विविध पथकं करुन पोलिसांना तपास करण्याची सूचना पोलिसांना दिली आहे, असंही त्यांनी सांगितलं.